लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ८ लाख ४४ हजार १९० मतदार ५३ जिल्हा परिषद तसेच १०६ पंचायत समिती सदस्यांची निवड करणार आहेत. ही अंतिम मतदार यादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे.जिल्हा परिषदेचे गट व त्यांतर्गत जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या गणांची प्रारूप मतदार यादी २ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालये व सातही पंचायत समित्यांमध्ये मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. त्या मतदार याद्यांवर पातूर तालुक्यात ३, बाळापूर तालुक्यात १ आक्षेप नोंदविण्यात आले.त्यावर सुनावणीनंतर जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणनिहाय मतदार याद्या ८ नोव्हेंबर रोजी अधिप्रमाणित करण्यात आल्या. मतदान केंद्र आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी ११ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
मूर्तिजापुरात अधिक तर पातुरात कमी मतदार संख्येची रचनाजिल्हा परिषदेच्या गट, गणांची रचना मतदारसंख्या, लोकसंख्येच्या मर्यादेनुसार करण्यात आली. त्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील गटांमध्ये १७ हजारांच्या जवळपास मतदारसंख्या राहणार आहे. तर पातूर तालुक्यातील गटांमध्ये १४ हजारांच्या जवळपास मतदारसंख्या आहे. तर अकोला, बार्शीटाकळी तालुक्यातील गटांमध्ये १६ ते १७ हजार, अकोट, तेल्हारा तालुक्यात १४ ते १५ हजार, बाळापूर तालुक्यात १६ ते १७ हजार मतदारसंख्या ठरवण्यात आली आहे.