बोरगाव मंजू ( अकोला) : येथील मुख्य रस्त्यावर ग्रामीण बँकेसमोर एका मोटारसायकलीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्याने १७ मार्च रोजी दुपारी ८0 हजार ५00 रुपयांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत माहिती मिळताच बोरगावमंजू पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो पसार होण्यात यशस्वी ठरला. येथील किराणा व्यापारी गजानन मालगे हे मंगळवारी त्यांच्या एमएच ३0-६३६२ क्रमांकाच्या मोटारसायकलने २१ हजार रुपये घेऊन महाराष्ट्र बँकेमध्ये गेले होते. तेथे त्यांनी खात्यातून ३८ हजार रुपये काढले. रक्कम थैलीत ठेवून ते ग्रामीण बँकेत गेले. तेथील त्यांच्या खात्यातून २१ हजार ५00 रुपये काढले. अशाप्रकारे एकूण ८0 हजार ५00 रुपये असलेली थैली त्यांनी मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवली होती. त्यानंतर त्यांनी मोटारसायकल सुरू करण्याचा प्रयत्न केला असता, चाक पंर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या एका मित्रास बोलावून मोटारसायकल लोटत लोटत पंर काढण्यासाठी दुकानात आणले. तेथे ती उभी केली असता, त्यांना त्यांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतील ८0,५00 रुपयांची रक्कम गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना घाम फुटला. ते धावतच ग्रामीण बँकेसमोर आले व त्यांनी मित्राला सदर हकिगत सांगितली. त्याची तेथील लोकांमध्ये चर्चा झाली. तेव्हा मुख्य रस्त्यावरील एका दुकानदाराने त्यांच्या मोटारसायकलमागे एक अनोळखी इसम उभा होता, असे सांगितले. त्यावरून त्या अनोळखी इसमाने त्यांच्या रकमेवर हात साफ केला असावा, असे वाटून मालगे यांनी बोरगावमंजू पोलीस ठाण्यात धाव घेतली. ही घटना आणि अनोळखी इसमाच्या वर्णनाची नोंद करून पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या फिर्यादीवरून बोरगावमंजू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि.च्या ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार डी. के. आव्हाळे यांनी या गुन्ह्याची गंभीरतेने दखल घेऊन शहरासह महामार्गावर नाकाबंदी केली. परंतु, आरोपी हाती लागले नाहीत. या प्रकरणी ठाणेदार आव्हाळे पुढील तपास करीत आहेत.
बँकेसमोर उभ्या मोटारसायकलच्या डिक्कीतून ८0 हजार लंपास
By admin | Published: March 18, 2015 1:53 AM