- संजय खांडेकरअकोला : गत आठवडाभरात तूर डाळ चक्क ८०० रुपयांनी वधारली असून, सणासुदीच्या तोंडावर तूर डाळ पाच हजारांच्या पार जाण्याची दाट शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे.मागील वर्षी तुरीचे पीक भरघोस निघाल्याने तूर डाळीचे भाव घसरले होते. अनेक ठिकाणी तूर आणि तुरीच्या डाळीला भाव मिळाला नाही. त्यामुळे तुरीचा पेरा कमी झाला. सोबतच नाफेडने ३० लाख पोते तूर डाळ विकली. त्यात परतीचा पाऊस अजूनही न आल्याने तुरीचे पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे यंदा तुरीचे उत्पादन कमी येणार आहे. मागील २०१६-१७ वर्षातील (शासनाचा) नाफेडचा स्टॉक संपुष्टात आला आहे. १७-१८ चा तुरीचा स्टॉक तीन लाख क्विंटल नाफेडकडे शिल्लक आहे. एकीकडे तूर नाही आणि भविष्यात तूर येण्याची शक्यता मावळली आहे, त्यामुळे तुरीच्या डाळीचे भाव वधारले आहे. मागील आठवड्यात तुरीची डाळ ३५०० रुपये क्विंटल होती. ती डाळ या आठ दिवसांत वधारून ४३०० रुपये क्विंटल झाली आहे. आठ दिवसांत तूर डाळीने आठशेचा आकडा पार केल्याने तूर डाळ येत्या काही दिवसांत पाच हजारांचा पल्ला गाठणार असल्याचे संकेत आहेत. तूर डाळ ऐन सणासुदीत वाढल्याने आता शेतकऱ्यांपेक्षा व्यापाºयांचीच चांदी होणार आहे. तीन महिने नवीन पीक येणार नसल्याने तूर डाळीचा भाव पाच हजार रुपये क्विंटल होणार आहे. तरीही एमएसपीच्या खालचे म्हणजे ५५०० च्या पार हे भाव जाणार नसल्याचेही बोलले जात आहे.