अकोला: लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर होणार आहे. खदान परिसरातील सरकारी गोदाम येथे मतमोजणी होणार आहे. यानिमित्ताने सिंधी कॅम्पसह खदान परिसरामध्ये गुरुवारी तब्बल ८०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.लोकसभा निवडणुकीचा अकोला मतदारसंघाचा निकाल २३ मे रोजी जाहीर होत आहे. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक सिंधी कॅम्प परिसरात मोठी गर्दी करणार असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि मतमोजणीच्या ठिकाणीसुद्धा कोणताही गोंधळ होऊ नये, या दृष्टिकोनातून कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोजन पोलीस विभागाने केले आहे. मतमोजणीच्या दिवशी अकोला-मंगरूळपीर रोडवरील वाहतूक बंद करून ती वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. खदान परिसर ते सिंधी कॅम्प परिसरातील दुकानेसुद्धा बंद ठेवण्यात येणार आहेत. परिसरातील होणारी गर्दी पाहता, तब्बल ८०० पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. यासोबतच सीसी कॅमेरे, व्हिडिओ शूटिंगचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक हालचालीवर पोलिसांचे लक्ष राहणार असून, या पोलीस बंदोबस्ताचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनीसुद्धा आढावा घेतला आहे. (प्रतिनिधी)