अकोला : जिल्ह्यात रविवारी राबविण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरणांतर्गत ८२ टक्के बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजण्यात आला. यामध्ये शहरी भागात ७२, तर मनपा आणि ग्रामीण भागात ८३ टक्के लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागामार्फत देण्यात आली. लसीकरण मोहिमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन पातूर तालुक्यातील बाभूळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे करण्यात आले.
जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सावित्रीबाई राठोड, जि.प. सदस्य सुनील फाटकर, विनोद देशमुख, अर्चनाताई राऊत, पं.स. सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, उपसभापती नजमुनिस्सा मो. इब्राहीम, उपसरपंच अनिल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुलचंद्र शिरसाट, हत्तीरोग अधिकारी डॉ. विवेक पेंढारकर, हिरासिंग राठोड, मो. इब्राहीम, जनार्दन डाखोरे, संजय फाटकर, शिवहरी खेडके यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी केले, तर आभार डॉ. विवेक पेंढारकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यात १,४९१ बूथवर लसीकरण
महापालिका कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील १ हजार ४९१ बूथवर रविवारी पल्स पोलिओ लसीकरण माेहीम राबविण्यात आली. मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ० ते ५ वर्ष वयोगटातील १ लाख ८५ हजार ९०९ चिमुकल्यांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ५२ हजार ५६६ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. उर्वरित २० टक्के बालकांना येत्या तीन दिवसांत मोबाइल पथकांमार्फत पोलिओ लसीकरण केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.