पावसाच्या दिवसात मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर सापांच्या बिळात पाणी शिरते. त्यामुळे भक्ष्य शाेधण्यासाठी व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून-ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. भारतात आढळणाऱ्या ५२ विषारी सापांपैकी जिल्ह्यात केवळ चार जातीचे विषारी साप आढळतात. ते म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे हे आहेत. काही दिवसांपासून सापांचा मानवी वस्तीत संचार वाढला आहे. सर्पमित्रांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी १ जून ते २६ जून या कालावधीत आढळलेल्या ८४ सापांना पकडून जीवदान दिले. त्यात २१ विषारी सापांचा समावेश होता. शेतकरी तसेच नागरिकांनी साप आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
या सर्पमित्रांनी सापांना दिले जीवदान
बाळ काळणे, अमोल नवले, दीपक डाखोरे, विलास पिंजरकर, शैलेश गोंगले, सूरज झायदे, तुषार आवारे, पंकज आठोले या सर्पमित्रांनी सापांना जीवदान दिले.
सर्वाधिक संख्या नागांची
निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सर्पमित्र सदस्यांनी २६ दिवसांत पकडलेल्या २१ विषारी सापांमध्ये सर्वाधिक संख्या नागांची होती. तसेच मण्यार जातीच्या सापाला पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. शिवाय कवड्या, धामण, गवत्या, तस्कर, पानदिवड आदी बिनविषारी साप त्यांनी पकडत सुरक्षितपणे जंगलात सोडले.
घरापासून सापांना दूर ठेवण्यासाठी हे करावे!
सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी घराच्या भिंतीनजीकची बिळे बुजवावीत, पालापाचोळा काढून परिसर साफ करावा.
लाकडाचे ढीग, दगड विटांचे ढीग हटवावेत. सरपण गोवऱ्या घरालगत न ठेवता दूर उंच जागेवर ठेवाव्यात. दरवाजे,
खिडक्यांच्या नजीक असलेल्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात. रात्रीच्यावेळी बॅटरी घेऊनच बाहेर पडावे. गवतात चालताना बूट घालावेत.
पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात काम करताना शेतकऱ्यांनी सावध रहावे, जून ते ऑगस्ट दरम्यान सर्वाधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. जून महिन्यात पावसामुळे साप बिळांच्या बाहेर येतात. साप दिसल्यास सर्पमित्रांशी संपर्क करावा.
- बाळ काळणे, सर्पमित्र