हिवरखेड(जि. अकोला), दि. ४- अकोला जिल्ह्यामधील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना म्हणून ओळखली जात असलेल्या ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा ४ मार्चच्या संध्याकाळी बंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणीपट्टीची थकीत असलेली ४0 लाख रुपयांची रक्कम वेळेत न भरल्याच्या कारणाने वान प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने पाणीपुरवठा बंद केला आहे. यामुळे ८४ खेड्यांमधील ग्रामस्थांवर आता पाण्यासाठी भर उन्हात वणवण करण्याची वेळ आली आहे.२00५ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला वान प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी ८४ खेडी पाणीपुरवठा योजना हस्तांतरित करण्यात आली होती. तेव्हापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेमार्फत संबंधित खेड्यांतील ग्रामस्थांना पाणी पुरविण्याचे काम करीत आहे. या योजनेद्वारे अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, चोहोट्टा बाजार, अडगाव, सिरसोली, तळेगाव बाजार व हिवरखेड या मोठय़ा गावांसह एकूण ८४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु मागील ८ ते ९ महिन्यांपासून वान प्रकल्प विभागाची ४0 लाख रुपयांची पाणीपट्टी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे थकीत आहे. वान प्रकल्प विभागाने वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने थकीत बिलाची रक्कम जमा केलेली नाही. अखेर वान प्रकल्प विभागाने पाणीपट्टीची थकीत रक्कम भरण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला दोन दिवसांची मुदत असलेला अल्टिमेटम दिला. त्यामध्ये ६ मार्चपर्यंंत थकबाकी रक्कम जमा न केल्यास ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा कोणत्याही क्षणी बंद करू, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सूचित केले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाणीपुरवठा विभागाकडे पाणीपट्टीची ४0 लाख रुपयांची थकबाकी असल्यामुळे ती रक्कम न भरल्यास दोन दिवसांमध्ये पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल, असे आम्ही कळविले होते.- ई. जे. वैष्णव,शाखा अभियंता, वान प्रकल्प, वारी.
८४ खेडी योजनेचा पाणीपुरवठा बंद
By admin | Published: March 05, 2017 1:36 AM