अकोला : जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्यानुसार अकोला शहारासह जिल्ह्यातील १३ पाणी पुरवठा योजनांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत २५ आॅक्टोबर रोजी मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हावासीयांची तहान ८५.९१ दशलक्ष घनमीटर पाण्यावर भागविण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील धरणांमध्ये १५ आॅक्टोबर रोजी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले. त्यानुसार काटेपूर्णा, वान, मोर्णा, निर्गुणा, उमा प्रकल्प आणि मन नदीतून २०१९-२० या वर्षासाठी अकोला शहर पाणी पुरवठा योजनेसह जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा योजनांसाठी ८५.९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. बिगर सिंचन मागणी वजा करून प्रकल्पांमधील उर्वरित पाणीसाठ्यावर रब्बी हंगामासाठी सिंचनाचे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीच्या बैठकीत दिले.पाणी पुरवठा योजनांसाठी आरक्षण!जिल्ह्यातील काटेपूर्णा, वान, मोर्णा, निर्गुणा, उमा इत्यादी प्रकल्पांतून जिल्ह्यातील १३ पाणी पुरवठा योजनांसाठी पिण्याच्या पाण्याचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यामध्ये काटेपूर्णा धरणातून अकोला शहर व मलकापूर पाणी पुरवठा योजनेसाठी २४ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. तसेच महान येथील मत्स्यबीज केंद्र पाणी पुरवठा योजना ०.८५ दशलक्ष घनमीटर, ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ८ दशलक्ष घनमीटर, मूर्तिजापूर शहर पाणी पुरवठा योजना २.८३ दशलक्ष घनमीटर व एमआयडीसी पाणी पुरवठा योजनेसाठी ०.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. वान धरणातून अकोट शहर पाणी पुरवठा योजना ३.६० दशलक्ष घनमीटर, तेल्हारा शहर पाणी पुरवठा योजना २.५० दशलक्ष घनमीटर, ८४ खेडी पाणी पुरवठा योजनेसाठी ८.७० दशलक्ष घनमीटर, मोर्णा धरणातून पातूर शहर पाणी पुरवठा योजना ०.६० दशलक्ष घनमीटर, देऊळगाव-पास्टूल १६ गावे पाणी पुरवठा योजना १ दशलक्ष घनमीटर, निर्गुणा धरणातून आलेगाव-नवेगाव १४ गावे पाणी पुरवठा योजनेसाठी १ दशलक्ष घनमीटर, उमा धरणातून लंघापूर पाणी पुरवठा योजनेसाठी ०.७० दशलक्ष घनमीटर आणि मन नदीतून पारस औष्णिक केंद्रासाठी १८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. वान धरणातून शेगाव पाणी पुरवठा योजना ५.२७ दशलक्ष घनमीटर व जळगाव जामोद १४० खेडी पाणी पुरवठा योजनेसाठी ७.१३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्याची तहान भागविणार ८५.९१ दशलक्ष घनमीटर पाण्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 4:30 PM