-------------------------------------
शेगाव-आकोट महामार्गावरील २० पुलांचा भराव खचण्याची शक्यता!
अर्धवट पिंचिंगमुळे;
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
नया अंदुरा : शेगाव-आकोट महामार्गावरील अंदुरानजीक असलेल्या पानखास नाल्यावर जवळपास २० पुलांचे निर्माण केले आहे. या पुलाच्या दोन्हीकडेला भराव टाकण्यात आला आहे. याच्या कामामधे कंत्राटदाराने अर्धवट पिंचिंग केल्याने येणाऱ्या पावसाळ्यात टाकलेला भराव खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
पूर्णा नदीला पूर आल्यास पुराचे पाणी शेगाव-अकोट मार्गावरील पानखास नाल्यातून वाहते. या पुराच्या पाण्याचा प्रसार साधारणता दोन ते तीन किलोमीटर असतो. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जवळपास ४ ते ५ दिवस बंद राहते. तसेच दर पावसाळ्यात शेगाव-अकोट महामार्गाचा संपर्क तुटतो. ग्रामस्थांची समस्या लक्षात घेत या पानखास नाल्यावर जवळपास छोट्याछोट्या २० पुलांची निर्मिती केली आहे. या पुलांसाठी टाकलेला भराव व पुलांना दगडांची केलेली अर्धवट पिंचिंग यामुळे पुलाचा भराव खचण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत सापडले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधित कंत्राटदारांकडून दगडांच्या पिंचिंगचे काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी नया अंदुरा, हाता, अंदुरा, कारंजा रमजानपुर, निंबा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
---------------------------------------
कंत्राटदाराने दगडाच्या पिंचिंगचे काम अर्धवट केल्याने २० पुलांचा भराव खचण्याची भीती आहे. पावसाळ्यात पाणी शेतात शिरून नुकसान होण्याची शक्यता असल्याने पिंचिंगचे काम पूर्ण करावे.
- नारायण साबळे, माजी सैनिक शेतकरी.