अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळा इमारत बांधकामांसाठी ९ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी जिल्ह्यातील शाळांच्या याद्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत.
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिकस्त झालेल्या इमारती पाडून, नवीन इमारत बांधकामांसाठी ९ कोटी ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने मंजूर निधीतून शाळा इमारतींची बांधकामे करण्यासाठी जिल्ह्यातील संबंधित शाळांच्या याद्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आल्या आहेत. शाळांच्या या याद्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारतींच्या बांधकामांसाठी मंजूर निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे.
शाळांच्या दुरुस्तीसाठी
४.६९ कोटी मंजूर!
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारत दुरुस्तीच्या कामांसाठी ४ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी चालू आर्थिक वर्षात मंजूर आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शाळा इमारतींच्या दुरुस्ती कामांचे प्रस्तावदेखील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत.