मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविल्याने लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यात लालपरीची चाकेही रुतली. दरम्यान, अनलॉकनंतर एसटी महामंडळाची प्रवासी सेवा सुरळीत झाली; परंतु कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याने राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले. याचा फटका एसटीच्या प्रवासी वाहतुकीला बसला. केवळ अत्यावश्यक सेवेसाठी डिझेल खर्चही निघणार नाही अशा खर्चात फेऱ्या धावल्या. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. एसटी महामंडळानेदेखील हळूहळू ग्रामीण भागापर्यंत आपली सेवा पूर्ववत सुरू केली; मात्र प्रवासी सेवा बंद असल्याने मागील दीड वर्षाच्या काळात महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अकोला विभागातील अकोला व वाशिम जिल्ह्यातील उत्पन्नात ६२ टक्के घट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा महामंडळ आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे.
विभागातील बसेसची संख्या
३८३
विभागातील कर्मचारी संख्या
२,४६२
२०१९-२० वर्षातील उत्पन्न
१,४६,४३,००,०००
२०२०-२१ वर्षातील उत्पन्न
५५,४७,००,०००
एसटीची चाकेही कमी धावली!
२०१९-२० या काळात एसटी महामंडळाच्या बसेस ४ कोटी ९० लाख किमी धावल्या; परंतु २०२०-२१ मध्ये कोरोनामुळे बसेस २ कोटी ९ लाख किमी धावल्या. जवळपास २ कोटी ८१ लाख किमी म्हणजेच ५७ टक्के अंतर कमी झाले.
वाशिम जिल्ह्याचे उत्पन्न अधिक
एसटी महामंडळाच्या अकोला विभागांतर्गत अकोला व वाशिम हे दोन जिल्हे येतात. यामध्ये वाशिम जिल्ह्याचे उत्पन्न अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या जिल्ह्यातून उत्पन्नाचे स्रोतही अधिक आहे.
मालवाहतुकीचा मिळाला आधार
एसटी महामंडळाला नुकसानीतून सावरण्याचे काम एसटीची मालवाहतूक सेवा करीत आहे. ही सेवा सुरू झाल्यापासून मे महिन्यापर्यंत मालवाहतुकीतून १ कोटी ३७ लाख १ हजार ७३१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.