महान : संपूर्ण अकोला शहरासह नदीकाठावरील ६३ खेडी गावांची तहान मिटविणाऱ्या महान धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पडत नसल्याने महान धरणाचा जलसाठा १०० टक्क्यापर्यंत पोहचू शकला नसल्याने त्याचा फटका नदीकाठावरील ६३ खेड्यांना बसला आहे. धरणाच्या जलसाठ्यात पाहिजे तशी वाढ न झाल्यामुळे जुलै २०१७ पासून धरणातील पाणी नदीपात्रात सोडण्यात आले नाही. १९ मार्च रोजी माहितीनुसार महान धरणात सद्यस्थितीत १११३.०९ फूट, ३३९.२७ मीटर, ८.०६५ द.ल.घ.मी अर्थात ९.३३ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी १९ मार्च रोजी धरणात ११२६.७७ फूट, ३४३.४४ मीटर, ३५.१६८ द.ल.घ.मी. व ४०.७२ टक्के एवढा जलसाठा होता. या तुलनेत धरणात आजमितीला ३१ टक्के जलसाठा कमी आहे.महान धरणाची खालावलेली पाणी पातळी लक्षात घेता धरणातील पाणी केवळ अकोला शहरासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याने धरणातील पाणी नदीकाठावरील ६३ गावे, मत्स्य बीज केंद्र व सिंचनाकरिता पाणी धरणातून सोडण्यात आले नाही. सद्यस्थितीत धरणातून केवळ अकोला शहरालाच पाणी पुरवठा होत असून, त्यामुळे व बाष्पीभवनामुळे धरणाची पाणी पातळी दररोज सरासरी एक ते दोन से.मी.ने कमी होत आहे.अकोला शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी महान धरणात एकूण पाच व्हॉल्व्ह बसविलेले असून, त्यापैकी तीन व्हॉल्व्ह पूर्णपणे उघडे पडले आहे. तसेच विश्रामगृहाकडील धरणातील टेकड्या उघड्या पडल्या आहेत. इतकेच नव्हे, तर धरणाच्या मध्यभागी असलेल्या हगदरी टेकडीपासून पाणी शेकडो फूट दूरवर गेल्याने या टेकडीवर जांभरूण, कोथळी येथील महिला कपडे धुण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत. तसेच एरवी धरणाच्या पाण्यात बुडालेले असणारे ‘दीपमाय’चे मंदिरसुद्धा उघडे पडले आहे. धरणातील पाणी नदीपात्रात सोडणे बंद असल्याने काटेपूर्णा नदी सद्यस्थितीत कोरडीठण्ण पडली आहे.
महानच्या धरणात उरला ९.३३ टक्के जलसाठा; तिसरा व्हॉल्व्ह पडला उघडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:52 PM
महान : संपूर्ण अकोला शहरासह नदीकाठावरील ६३ खेडी गावांची तहान मिटविणाऱ्या महान धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस घसरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस पाहिजे तेवढ्या प्रमाणात पडत नसल्याने महान धरणाचा जलसाठा १०० टक्क्यापर्यंत पोहचू शकला नसल्याने त्याचा फटका नदीकाठावरील ६३ खेड्यांना बसला आहे.
ठळक मुद्देमहान धरणात सद्यस्थितीत १११३.०९ फूट, ३३९.२७ मीटर, ८.०६५ द.ल.घ.मी अर्थात ९.३३ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहरासाठी आरक्षित ठेवण्यात आल्याने धरणातील पाणी नदीकाठावरील ६३ गावे, मत्स्य बीज केंद्र व सिंचनाकरिता पाणी धरणातून सोडण्यात आले नाही. हगदरी टेकडीपासून पाणी शेकडो फूट दूरवर गेल्याने या टेकडीवर जांभरूण, कोथळी येथील महिला कपडे धुण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत.