अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील सुमारे ९४ वर्षे जुन्या इमारतीमध्ये अतिदक्षता विभागासह इतर महत्त्वाचे वॉर्ड सुरू आहेत. दीड वर्षापूर्वी झालेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक ठरविण्यात आली होती. त्यानंतरही याच इमारतीमध्ये महत्त्वाचे विभाग चालविण्यात येत आहेत. अशातच बुधवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी याच इमारतीमध्ये शिरले होते. त्यामुळे प्रशासन वेळीच जागे न झाल्यास ऐन पावसाळ्यात येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वत्रच पूर परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागातही गुडघ्याएवढे पाणी शिरले होते. अतिदक्षता विभाग असलेली ही इमारत १९२७ साली बांधण्यात आली असून सर्वोपचार रुग्णालयातील सर्वात जुनी इमारतदेखील हीच आहे. जानेवारी २०२० मध्ये झालेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये ही इमारत धोकादायक श्रेणीत ठेवण्यात आली होती. याच इमारतीमध्ये अतिदक्षता विभागासह वॉर्ड क्रमांक, पाच, सहा आणि सात आहेत. तसेच एक्स-रे, सीटी स्कॅन आणि औषध भांडार विभागही कार्यरत आहे. इमारत आधीच धोकादायक अवस्थेत असताना बुधवारी रात्री त्यात पाणी शिरल्याने इमारतीसाठी आणखी धोका निर्माण होऊ शकतो. ही स्थिती पाहता इमारतीची सुरक्षाविषयक तपासणी करणे गरजेचे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रुग्णांसोबतच वैद्यकीय उपकरणेही धोक्यात
इमारतीमध्ये जवळपास सर्वच महत्त्वाचे विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे या इमारतीमध्ये रुग्णालयातील सुमारे ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोक असतात. अशावेळी एखादी मोठी दुर्घटना झाल्यास रुग्णांसह त्यांचे नातेवाईक, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. तसेच याच इमारतीमध्ये एक्स-रे, सीटी स्कॅन यासारख्या वैद्यकीय उपकरणांसोबतच औषध भांडार विभागही याच इमारतीमध्ये असून ते देखील धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
प्रसूती व स्त्री रोग शास्त्र विभाग हलवला नव्या इमारतीमध्ये
प्रसूती व स्त्री रोग शास्त्र विभाग यापूर्वी याच इमारतीमध्ये कार्यरत होता. मात्र, या विभागासाठी नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यात आल्यानंतर हा विभाग नव्या इमारतीमध्ये हलविण्यात आला. त्यामुळे प्रसूती व स्री रोग शास्त्र विभागाला आता धोका राहिलेला नाही, मात्र इतर महत्त्वाचे विभाग अजूनही याच इमारतीमध्ये कार्यरत आहेत.
इमारतीला गळती
९४ वर्षे जुनी असलेल्या इमारतीच्या छताला नेहमीच गळती राहत असल्याची माहिती येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले. छताची वारंवार डागडुजीदेखील करण्यात आली आहे. पावसाळ्यात हा प्रकार वाढत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती आहे.