अकोला - जुना धान्य बाजारातील अनधिकृत ८७ दुकानांवरील संभाव्य कारवाईप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, प्रकरण तपासून १० जानेवारीपर्यंत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करा, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा महापालिकेच्या प्रभारी आयुक्त निमा अरोरा यांना दिले होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार बुधवारी धान्य बाजारातील एकूण ९५ दुकाने भुईसपाट करण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शहराच्या मध्यभागातील शिट क्र.३९ बी भुखंड क्रमांक १२ व ५४/१ शासन मालकीचा असून आजराेजी याठिकाणी जुना धान्य बाजार वसला आहे. तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत या जागेवर दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी शहरातील लघु व्यावसायिकांना परवानगी देण्यात आली हाेती. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडणाऱ्या लघु व्यावसायिकांनी या जमिनीवर पक्की व टिनची दुकाने उभारली. यामुळे शासनाच्या अटी व शर्तींचा भंग केल्याची तक्रार एका व्यावसायिकाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती.
तत्पूर्वी या प्रकरणी संबंधित दुकानदारांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका न्यायालयाने अमान्य केली हाेती. तरीही दुकानांचे अतिक्रमण कायम असल्याचे पाहून जिल्हाधिकारी निमा अराेरा यांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी यांना जुना धान्य बाजारातील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुषंगाने मनपाच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने काही दुकाने जमिनदाेस्त केली हाेती. परंतु स्थानिक राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे मनपाच्या कारवाइला ‘ब्रेक’लागला हाेता. यानंतर २ जानेवारी पासून धान्य बाजारातील अतिक्रमण निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी उत्तर झाेन कार्यालयाला दिले हाेते.
प्रभारी आयुक्त अराेरा यांच्या निर्देशानुसार उत्तर झाेन कार्यालय, अतिक्रमण निर्मुलन पथक व सीटी काेतवाली पाेलिस कारवाइसाठी सज्ज झाले हाेते. परंतु ऐनवेळेवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांचे पत्र महापालिकेत धडकले. त्यामध्ये सदर प्रकरण तपासून १० जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश होते.
सिंधी विस्थापितांच्या दुकानांवरही चालला गजराजजुना धान्य बाजारात सिंधी विस्थापितांसाठीही तत्कालीन नगर परिषदेच्या कालावधीत तात्पुरत्या व्यवसायाकरिता जागा दिली होती. यामध्ये १४ जागांवर टीनाचे शेड उभारून दुकाने उभारण्यात आली होती. यापैकी आठ दुकानदारांनी मनपाची परवानगी न घेता टीनाचे शेड उभारल्याचा ठपका ठेवत दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
आकसापोटी कारवाई; व्यावसायिकांचा आरोपजिल्हाप्रशासनाने आकसापोटी कारवाई करीत संपूर्ण दुकाने भुईसपाट केल्याचा आरोप संबंधित व्यावसायिकांनी केला. या कारवाईमुळे आमचे कुटुंबीय उघड्यावर आल्याच्या भावना व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.