कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. शिवाय, मृतकांचाही आकडा वाढताच आहे. अशा परिस्थितीत कोरोना म्हटलं की, सर्वांच्याच अंगाला काटा येतो. कोरोनाच्या भीतीनेच अनेकांची प्रकृती खालावते. मात्र, हिमतीने कोरोनाविरुद्धची लढाई जिंकलेल्या ९६ वर्षीय शांताबाई अमृतराव म्हैसणे या वृद्ध महिलेने सर्वांसमोर एक आदर्श ठेवला. शांताबाई म्हैसणे या कौलखेडस्थित प्रमोदनगर येथील रहिवासी आहेत. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांची प्रकृती अचानक खालावली. खोकला आणि ताप असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शनिवार ८ मे रोजी त्यांची रॅपिड ॲंटिजन चाचणी केली. चाचणी अहवालात त्या कोविड पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबीयांनाही धक्का बसला, पण हिम्मत हारली नाही. सुरुवातीचे पाच दिवस फॅमिली डॉक्टरांकडे उपचार घेतले, मात्र शरीरातील ऑक्सिजन पातळी अचानक कमी होऊन ८८ पर्यंत खाली आल्याने त्यांना १४ मे रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. शांताबाई यांना रुग्णालयात काही काळासाठी ऑक्सिजन लावण्यात आला. जगण्याची उमेद अन् डॉक्टरांवरील विश्वासामुळे त्या दहा दिवसांतच बऱ्या झाल्या. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात शांताबाई यांचा गृहप्रवेश करून त्यांचे स्वागत केले.
त्या नकळत घेत होत्या फुप्फुसांची काळजी
९६ वर्षीय शांताबाई म्हैसणे यांना प्राणायामातलं फारसं ठाऊक नसलं, तरी त्यांची दिवसाची सुरुवात यापासूनच होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सकाळी तुळशीजवळ जाऊन बसतात. तुळशीला प्रदक्षिणा घालतात. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन तर मिळतोच. सोबतच त्या डोळे बंद करून लांब श्वास घेणे व सोडणे ही प्रक्रिया नित्याने करत. त्यामुळे नकळत त्यांच्या फुप्फुसांचा व्यायाम होत होता. म्हणूनच, कोरोना होऊनही त्यांनी त्यावर सहज मात केली.
आजीला कोरोना झाला म्हणून आम्ही सुरुवातीला घाबरलो होतो, मात्र सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची चांगली काळजी घेतली. तसेच आजीने हिंमत हारली नाही. त्यामुळेच त्यांनी कोरोनावर मात केली. सध्या आजीची तब्येत चांगली असून, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कधी ९६ तर कधी ९७ एवढी राहते.
- धनंजय म्हैसणे, रुग्णाचा नातू