अकोला: आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या अनाथ मुला-मुलींचा सर्व्हे महसूल विभागामार्फत अकोला तालुक्यात करण्यात आला. त्यामध्ये तब्बल ९९ मुलं-मुली अनाथ आढळली असून, या अनाथ मुलांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमाह मदत दिली जाणार आहे.आई-वडील मयत झाल्यामुळे नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तीकडे राहणार्या अनाथ मुला-मुलींचा शोध घेऊन, त्यांचा सर्व्हे करण्याची मोहीम अकोला उपविभागीय कार्यालयामार्फत गेल्या १0 ते २५ जूनदरम्यान अकोला तालुक्यात राबविण्यात आली. तलाठी व मंडळ अधिकार्यांमार्फत १८ वर्षांंंपर्यंंंतच्या अनाथ मुलांच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल गत शनिवार, २८ जून रोजी अकोल्याच्या उपविभागीय अधिकार्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अकोला तालुक्यात विविध गावांमध्ये १८ वर्षांंंपर्यंंंतची तब्बल ९९ मुलं-मुली अनाथ आढळून आली. त्यामध्ये ५५ मुले आणि ४४ मुलींचा समावेश आहे. या अनाथ मुला-मुलींची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत दरमाह ६00 रुपयांप्रमाणे मदतीचा आधार देण्यात येणार आहे. त्यासाठी अनाथ मुला-मुलींकडून अर्ज भरून घेतल्यानंतर येत्या ऑगस्टपासून त्यांना दरमाह मदत सुरू करण्याचे प्रयत्न उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सुरू आहेत. याशिवाय संबंधित अनाथ मुला-मुलींच्या शैक्षणिक साहित्याचा खर्च भागविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्याचे प्रयत्नदेखील महसूल विभागाकडून करण्यात येणार आहेत.
अकोला तालुक्यात ९९ मुलं-मुली अनाथ!
By admin | Published: July 02, 2014 12:27 AM