अकोला: शहरातील गोरक्षण रोडवरील शिवरत्न ज्वेलर्स नामक सराफा दुकान मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील पाच लाख रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सराफा व्यापाऱ्याची दुचाकीही लांबवली. याप्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस तपास करीत आहेत.
सराफा व्यावसायिक सुरेंद्र विसपुते यांच्या तक्रारीनुसार मंगळवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते. बुधवारी सकाळी चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी दुकानाकडे धाव घेऊन खदान पोलिसांनाही सूचना दिली. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड केली आणि नंतर दुकानात शिरून चोरट्यांनी त्यांच्या दुकानातील सुमारे ५ ते ७ लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले.
सोबतच सराफा व्यापारी विसपुते यांची दुचाकीही चोरट्यांनी चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभयकुमार डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर, खदानचे ठाणेदार धनंजय सायरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कार यांच्यासह फिंगरप्रिंट तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.