अकोला : अकोट येथील सहायक पोलिस निरीक्षक राहुल देवकर यांनी आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर होईपर्यंत अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दीड लाखांच्या लाचेची मागणी केलयांतर एक लाख २५ हजारांची लाच स्वीकारून एसीबीची भनक लागतात पळून गेलेल्या देवकर विरुद्ध आकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोट शहरातील रहिवासी तसेच अडत व्यावसायिक तक्रारदार यांनी ५ एप्रिल रोजी एसीबी अमरावती कार्यालयात तक्रार दिली. तक्रारदार यांच्यावर सह दुय्यम निबंधक अकोट विभागाने कारवाई करून अकोट शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याची चार्जशीट पाठवताना मदत करण्यासाठी व तक्रारदार यांच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन मंजूर होईपर्यंत त्यांना अटक न करण्यासाठी तपास अधिकारी एपीआय राहुल देवकर यांनी १ लाख ५० हजार रूपयांची मागणी केल्याची तक्रार दिली. त्यावरून अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ६ एप्रिल रोजी पडताळणी करून देवकर यांनी आरोपीच्या बाजूने तपास करून सदर गुन्ह्याची चार्जशीट पाठवताना आरोपीला मदत करण्यासाठी दीड लाख रूपयांची मागणी केल्याचे समोर आले. तडजोडीअंती सव्वा लाख रूपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
लाच स्वीकारत असताना चारचाकी वाहन क्रमांक एमएच २७ डी.ई. ४२५५ या वाहनाने लाच रक्कम घेऊन पळून गेल्याने त्यांच्या तपासकामी दोन पथके रवाना करण्यात आली आहे. अकोट-दर्यापूर मार्गावरील कोल्हे हॉस्पिटलच्या जवळील प्रांगणात लाच स्वीकारत असताना देवकर यांना संशय आल्याने लाचेची रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला होता. याप्रकरणी अकोट शहर पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.