अकोला : इलेक्ट्रिक मीटरशी तारा न जोडता मीटरच्या अगोदर अन्य तारेच्या साहाय्याने अनधिकृत जोडणी करून वीजचोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाळापूर नाका गुरूदेव नगरातील रवींद्र गोतीराम नरवाडे (५०) यांच्याविरूद्ध अकोट फैल पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.
महावितरणचे कार्यकारी अभियंता संतोष हिरासिंग राठोड यांनी याबाबत तक्रार केली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर नाका परिसरातील गुरूदेव नगरात राहणारे रवींद्र नरवाडे यांनी त्यांच्या घरात इलेक्ट्रिक मीटर तारा न जोडता मीटरच्या अगोदर अन्य तारेच्या साहाय्याने अनधिकृत जोडणी करून २,२४४ युनिट वीजचोरी केल्याचे समोर आले. त्यांना ४५ हजार रुपयांचे देयक देण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत वीज बिलाचा भरणा केला नाही. अखेर त्यांच्याविरूद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ सुधारित २००७ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला.
आझाद कॉलनीतही वीज चोरीमहावितरणचे अभियंता संतोष राठोड यांच्या तक्रारीनुसार आझाद कॉलनीतील राजदार खान हुसैन खान (६०) यांनी राहते घरी शेख अकबर जमील यांच्या नावे असलेल्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. राजदार खान यांनी ६८१३ युनिटची वीज चोरी करून महावितरणचे १ लाख २९ हजार ५७२ रुपयांचे नुकसान केले. त्यांनी वीज बिलाचा भरणा न केल्यामुळे त्यांच्याविरूद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ सुधारित २००७ चे कलम १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
c