अकोला: शहरातील न्यू राधाकिसन प्लॉट मधील एका मेडिकल व्यावसायिकाला वर्षभरापासून सातत्याने दीड लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अकोला महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्या विरुद्ध गुरुवारी उशिरा रात्री सिटी कोतवाली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
न्यू राधाकिसन प्लॉट परिसरात मेडिकलचा व्यवसाय करणारे मॉन्टी अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार रिपाइंचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे हे गत वर्षभरापासून दीड लाख रुपयांची खंडणी मागत असल्याचा आरोप केला आहे. अग्रवाल यांना दीड लाख रुपये देणे शक्य नसल्यामुळे गजानन कांबळे यांनी त्यांना दर महिन्याला वीस हजार रुपये खंडणी देण्याची मागणी केली. परंतु अग्रवाल यांना खंडणी द्यायची नसल्यामुळे ते गजानन कांबळे यांना टाळत होते.
परंतु खंडणीसाठी कांबळे यांचा होका कायम राहिल्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून मॉन्टी अग्रवाल यांनी गुरुवारी रात्री गजानन कांबळे यांच्या विरोधात सिटी कोतवाली पोलिसात धाव घेतली आणि त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी गजानन कांबळे यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान 387 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गजानन कांबळे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.