अकोला: अवकाशात दररोज विविध खगोलीय घटना घडत असतात. ऑगस्ट महिन्यात आकाशप्रेमींना भूरळ घालणऱ्या ठळक १२ खगोलीय नजाऱ्यांची मेजवानी मिळणार आहे. यापैकी ५ ऑगस्टपर्यंत तीन घटना घडून गेल्या असून, उर्वरित नऊ घटना आगामी काळात अनुभवता येणार आहे.
विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी आपले चंद्रयान ३ पृथ्वीवरून चंद्रकक्षेत गेल्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला असून, याच दिवशी काहीशा ढगांच्या लपंडावात आपण अनेकांनी यावर्षीचा सर्वात जास्त मोठा चंद्र अर्थात सुपरमून अनुभवला आहे. ५ ऑगस्ट रोजी आकाशात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दर्शन ७:४३ ते रात्री ७:४९ या कालावधीत अत्यंत चांगल्यापैकी दर्शन झाले. त्याचबरोबर ८ ऑगस्ट रोजी अत्यंत तेजस्वी असलेल्या शुक्राचा पश्चिमेस अस्त आहे. यालाच ग्रामीण भागातील लोक चांदणी बुडी गेली असे म्हणतात. तसेच ९ ऑगस्ट रोजी दक्षिण क्षितिजावर अत्यंत रंगीत असलेल्या अगस्त्य ताऱ्याचा उदय होईल.
गेल्या तीन महिन्यांपासून न दिसणारा तारा बघता येईल. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी पूर्व क्षितिजावर रात्री एकच्या नंतर ययाती तारका समूहातून विविध रंगी उल्का पडताना दिसतील आणि त्यांचा वेग हा दर ताशी ६० च्या जवळपास असेल. पहाटे त्याचा वेग वाढेल. १३ ऑगस्टलाच बुध आणि मंगळ या दोन ग्रहांची युती आपल्याला पश्चिमेस सायंकाळी बघता येईल. चंद्राप्रमाणेच शुक्राची अमावास्या १३ ऑगस्ट रोजी सूर्य, शुक्र व पृथ्वी एका रेषेत येईल. १६ ऑगस्ट या दिवशी चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याने चंद्रबिंब आकाराने लहान असेल.
नुसत्या डोळ्यांनी दिसणारे पाचही ग्रह १८ ऑगस्टपासून आपल्यासाठी दर्शनार्थ सज्ज असतील. याच दिवशी शुक्राचा पहाटे पूर्वेला उदय होत आहे. सोबतच सुरुवातीला शनी ग्रह रात्रीच्या प्रारंभी कुंभ राशीत तर गुरु ग्रह त्यानंतर आपल्याला दर्शनासाठी मेष राशीत सज्ज असेल. तसेच सायंकाळी मंगळ व बुध हे ग्रह युती स्वरूपात एकमेकांजवळ पश्चिमेस पाहता येतील. २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चे चंद्रावर अवतरण होणार आहे. त्यामुळे हा क्षण आपल्या सर्वांसाठी अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा असेल. २७ ऑगस्ट रोजी सूर्य, पृथ्वी व शनी हे एका रेषेत येत असल्याने शनीग्रह रात्रभर दर्शन देत राहील. यानंतर ३१ ला चंद्र पृथ्वीपासून जवळ आल्याने या वेळी ब्ल्यू सुपरमून बघता येईल.