अकोला : शास्त्री स्टेडियममध्ये असलेल्या भंगार बाजारातील काही दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या आगीत भंगार बाजारातील सात ते आठ दुकाने जळून खाक झाली असून त्यामधील सुमारे दहा लाख रुपयापेक्षा अधिक मुद्देमाल जळाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन दलाने तातडीने पाण्याच्या बंबाद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
शास्त्री स्टेडियममध्ये नीता गेस्ट हाऊस समोर भंगार बाजार असून या भंगार बाजारातील प्लास्टिक व इतर साहित्याला शुक्रवारी पहाटे आग लागली. शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. याआगीत भंगार बाजारातील आठ ते दहा दुकाने जळून खाक झाली असून यामधील लाखो रुपयांचे मुद्देमाल नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाद्वारे तातडीने घटनास्थळावर धाव घेऊन आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. महसूल विभागाकडूनही नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले आहे.
मोठी हानी टळली शास्त्री स्टेडियममध्ये असलेल्या भंगार बाजारात मोठी आग लागली होती. या स्टेडियमच्या मैदानात फटाका बाजार असून काही अंतरावरच असलेल्या फटाका बाजाराला या आगीची झळ लागली असती तर मोठ्या प्रमाणात हानी झाली असती अशी माहिती घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींनी दिली; मात्र सुदैवाने आगीवर तातडीने नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळल्याची माहिती आहे.