अकोला : ढोल ताशांचा गजर, खांद्यावर पुर्णेचे जल भरलेल्या कावड, अनवाणी पायाने तब्बल १८ किमीचे अंतर कापल्यावरही चेहऱ्याावर प्रसन्नता अन् उत्साह व मुखातून हर हर महादेवाचा जयघोष अन् गुलाल आणि फुलांची उधळण अशा मनोहरी वातावरणात अकोल्याच्या कावड महोत्सवात भक्ती आणि श्रद्धा यांचा अपूर्व संगम सोमवारी पाहावयास मिळाला.
अकोला शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात श्रावण उत्सव साजरा केला जातो. श्रावणातील दर सोमवारी शिवभक्त श्रद्धापूर्वक जलाभिषेक करतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी १८ कि.मी. अंतरावर असलेल्या गांधीग्राम (वाघोली) येथून पूर्णा नदीचे पाणी कावडीने आणून राजेश्वराला जलाभिषेक केला जातो. ७८ वर्षांच्या परंपरेनुसार सोमवारी अकोला शहरात कावड -पालखी उत्सव साजरा करण्यात आला. ‘हर्र ऽ ऽ ऽ बोला महादेव’च्या गजरात ग्रामदैवत श्री राज राजराजेश्वराला हजारो शिवभक्त कावडधारी मंडळांसह युवकांनी जलाभिषेक केला. पालखी-कावड उत्सव पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. कावड यात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
शेकडो पालख्या व कावडधारी लहान-मोठे मंडळे या उत्सवात सहभागी झाले होते. गांधीग्राम येथून पायी शिवभक्त खांद्यावर शिवशंकराची पालखी व कावड घेऊन आले. वल्लभनगर, उगवा फाटा, शिलोडा, आकोट फैल, रेल्वे पुलावरून शिवाजी पार्क, राजकमल चौक, गवळीपुरा, आकोट स्टँड, माळीपुरा चौक, उदय टॉकीज, जुना कापड बाजार, सराफा बाजार, दाणा बाजार, गांधी चौक, गांधी मार्ग, सिटी कोतवाली चौक, लोहा पूल, जय हिंद चौक मार्गे या सर्व पालख्या व कावडी राजेश्वर मंदिरात पोहोचत आहेत.
शिवभक्तांनी राजेश्वराला जलाभिषेक केल्यानंतर एक-एक करीत सर्वच मंडळांनी पूर्णेच्या पवित्र जलाने राजेश्वराला अभिषेक केला. रात्री उशिरापर्यंत अभिषेक सुरू होता. कावड व पालखी घेऊन आलेल्या शिवभक्तांनी श्रद्धापूर्वक राजेश्वराचे दर्शन घेतले व जलाभिषेक केला. कावड घेऊन येणार्या शिवभक्तांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांनी शिवभक्तांना चहा, फराळ व भोजनाचे वाटप केले. राजकीय नेत्यांनीही शिवभक्तांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
अशी आहे परंपरा1944 साली स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना अकोल्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्याचवेळी अकोल्यातील काही तरूणांनी ग्रामदैवताला जलाभिषेकाचा संकल्प केला. त्याच वर्षी मोठा पाऊसही पडला अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून ही यात्रा सुरू आहे. हजारावर भरणे कळशांची कावड मंडळं या यात्रेतील प्रमुख आकर्षण असते.