अकोला: शहरालगतच्या हिंगणा परिसरात शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक बिबट्याचे दर्शन झाले. परिसरात बिबट फिरताना आढळून आला. बिबट्याने भोला जाधव नामक मजुरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच, जुने शहर पोलिसांसह वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभित झाले असून, नागरिकांनी सकाळपासून दारे, खिडक्या बंद करून बंदिस्त केले आहे. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहरापासून काही अंतरावर हिंगणा व नवीन हिंगणा ही गावे आहेत. या गावांमध्ये बिबट शिरला असून, बिबट्याने ८ सप्टेंबरच्या सकाळपासून चांगलीच दहशत निर्माण केली आहे. नागरिकांसह लहान मुलांचे घरांमधून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. बिबट्या परिसरातील घरांमध्ये फिरत असून, भोला यादव(६५) नामक मजूर व राकेश राजभर(३०) यांचा पाठलाग करीत, बिबट्याने त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यासोबतच बिबट्याने आणखी दोन युवकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचेही कॅमऱ्यातून दिसत आहेत.
घटनेची माहिती मिळताच, जुने शहराचे ठाणेदार नितीन लेव्हरकर, पीएसआय रविंद्र करणकार, श्याम पोधाडे, छोटू पवार यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळाकडे धाव घेऊन बिबट्याला पकण्यासाठी रेस्कु ऑपरेशन सुरू केले आहे.