अकोला: भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी शहरातून जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीरांच्या जयघोषाने राजराजेश्वर नगरी दुमदुमून गेली होती.
शोभायात्रेमध्ये अहिंसा, शांतीचा संदेश देणारे अनेक चित्ररथ सहभागी झाले होते. येथील श्री आदेश्वर श्री संभवनाथ जैन श्वेतांबर मंदिर, श्री स्थानकवासी जैन समाज व श्री वासुपूज्य जैन मंदिर यांच्या वतीने वाजतगाजत, तुतारीच्या निनादात जय जिनेंद्रच्या जयघोषात ही शोभायात्रा काढण्यात आली. शाेभायात्रेला आदिनाथ जैन मंदिरातून सुरुवात झाली. ही शोभायात्रा गांधी रोड, गांधी चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, जुना कापड बाजारमार्गे आदिनाथ जैन मंदिरात आली. याठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
आदिनाथ जैन मंदिरात भगवान महावीरांचे पूजन करण्यात आले. तसेच शोभायात्रा मार्गावर मोतीचूर लाडूं ताकाचे नागरिकांना वितरण करण्यात आले. शोभायात्रेत चिमुकली मुले सायकल घेऊन सहभागी झाली होती. लूक ॲन्ड लर्न स्कूलच्या वतीने शोभायात्रेत अनेक चित्ररथ सहभागी झाले होते. महावीर मित्रमंडळाच्या वतीने मठ्ठ्याचे वितरण महावीर मित्रमंडळाच्या वतीने शोभायात्रेतील समाजबांधव व नागरिकांना थंडगार मठ्ठ्याचे वितरण करण्यात आले.