वणी वारुळा (अकोला) : अकोट तालुक्यातील तांदुळवाडी येथील आजोबा नातवासोबत सोनबर्डी येथे म्हैस घेऊन गेले होते. तेथून घरी परतताना आजोबाच्या हातची तंबाखूची डबी व नातवाच्या पायातील चप्पल पाण्यात पडली. ती पाण्यातून काढत असताना आजोबा व नातू दोघेही नदीपात्रात पडून वाहून गेल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये आजोबांचा मृत्यू झाला असून नातवाचा नदीपात्रात रात्री उशीरापर्यंत पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाकडून शोध सुरू होता.
तांदूळवाडी येथील ६० वर्षीय शेतकरी प्रभाकर प्रल्हाद लावणे व त्याचा ११ वर्षीय नातू आदित्य विनोद लावणे हे जवळच असलेल्या ग्राम सोनबर्डी येथे म्हैस घेऊन गेले होते. सोनबर्डी येथून घराकडे परत येताना मोहाडी नदीच्या पुलावर आजोबा प्रभाकर लावणे यांची तंबाखूची डबी पाण्यात पडली. तसेच नातवाची चप्पलसुद्धा पाण्यात पडली. दोन्ही वस्तू पाण्यातून बाहेर काढताना नातवाचा पाय घसरून तो पाण्यात पडला. नातू वाहत जात असल्याचे दिसताच आजोबा प्रभाकर लावणे यांनी नदीपात्रात उडी घेऊन नातावाला वाचविण्यासाठी प्रयत्न केला. नातवाला पकडण्यासाठी त्यांना यश सुद्धा आले होते, मात्र नियतीने साथ दिली नाही. पाणी जास्त असल्याने नातू व आजोबा बुडाले. ही बाब स्थानिक युवकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आजोबा नातावाला बाहेर काढण्यासाठी शोध सुरू केला. आजोबा प्रभाकर लावणे यांना बाहेर काढले, परंतू त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, नातवाचा अद्यापही शोध लागला नाही.
आदित्यचा शोध सुरूचयुवकांनी आजोबा प्रभाकर प्रल्हाद लावणे यांना बाहेर काढून तत्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गावातील नागरिकांनी शोध मोहीम केली असून, अद्याप नातवाचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती आकोट तहसीलदार निलेश मडके, आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख, गटविकास अधिकारी शिंदे, मंडळ अधिकारी प्रशांत सहारे, तलाठी घुगे, तलाठी खेडकर, ग्रामसेवक खारोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आदित्यचा शोध पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाचे पांडुरंग तायडे व त्याचे टिम कडून सुरू आहे. घटनेमुळे तांदूळवाडी परिसरात शोक पसरला आहे.