अकोला : जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शनिवारी (६ जुलै) अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील प्रवीण प्रभाकर जंजाळ या जवानाला हौतात्म्य आले. जवानाच्या रेजिमेंटकडून ही माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे मात्र रात्री उशिरापर्यंत कोणतीही माहिती प्राप्त झाली नव्हती.
प्रवीण जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये २०२० मध्ये भरती झाले होते. त्याची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. चार महिन्यांपूर्वी सैन्यदलाच्या राष्ट्रीय रायफलच्या (विशेष दस्ता) क्रमांक एकच्या तुकडीत कुलगाम जिल्ह्यात त्यांना पाठवण्यात आले होते. या पथकासोबतच कुलगाम जिल्ह्यातील मोडरगम येथे शनिवारी दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. येथे सहा दहशतवादी असल्याची माहिती होती. चौघांना ठार केल्यानंतर दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या अंधाधुंद गोळीबारात प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागल्याची माहिती आहे. यातच त्यांना हौतात्म्य आले, अशी माहिती रेजिमेंटतर्फे कुटुंबीयांना देण्यात आली.
रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांनी मोरगाव भाकरे येथील सरपंच उमाताई ज्ञानेश्वर माळी यांच्यासोबत संपर्क साधून प्रवीण यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला व प्रवीण यांना हौतात्म्य आल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. त्यामुळे जंजाळ कुटुंब व मोरगाव भाकरे गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. प्रवीण यांचा महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे.
चार महिन्यांपूर्वीच आले होते सुट्टीवर -प्रवीण जंजाळ चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. या सुटीत त्यांचा विवाह झाला होता. प्रवीण यांची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली.
प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात -प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठेबाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.
मोरगाव भाकरे येथील जवान जम्मू आणि काश्मिरमध्ये शहीद झाल्याची प्राथमिक माहिती गावातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली.- सुरेश कव्हळे, तहसीलदार, अकोला