अकोला : आगामी नवरात्रोत्सवात जिल्ह्यातील भाविकांना माहुर येथील रेणुका देवीचे दर्शन घेण्याकरीता जाता यावे, यासाठी अकोला आगार क्र. २ मधून २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत अकोला ते माहुर ही विशेष जादा बस सोडण्यात येणार आहे. मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज सकाळी बस सुटणार असल्यामुळे अकोलाकर भाविकांची सोय होणार आहे. नवरात्र सुरु होताच भाविकांना विविध ठिकाणच्या दुर्गा देवीच्या दर्शनाला जाण्याचे वेध लागतात. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहुर येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी अकोल्यातून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक जातात.
दरम्यान, माहुर येथे जाण्यासाठी थेट बस नसल्याने नवरात्रोत्सवात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अकोला आगार क्र. २ मधून नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून माहुरकरीता बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यवर्ती बसस्थानक येथून २६ सप्टेंबर पासून दररोज पहाटे ५.३० वाजता अकोला-माहुर ही विशेष बस सुटणार आहे. ही बस ११ वाजता माहुर बसस्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात माहुर-अकाला ही बस दुपारी २ वाजता माहुर येथून निघून अकोला येथे सायंकाळी ६.३० वाजता पोहोचणार असल्याचे अकोला आगार क्र. २ चे व्यवस्थापक प्रमोद इंगळे यांनी सांगितले.