अकोला : शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत असल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरट्यांची नाकाबंदी करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला देताच गुन्हे शाखेच्या पथकाने एका अट्टल चोरट्यास अटक केली. त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चोरट्याने अकोला जिल्ह्यात तीन ठिकाणी तर अमरावती जिल्ह्यात दोन ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली.
जिल्ह्यातील अकोट शहरातील रहिवासी शरद अशोक सहारे वय ३० वर्ष याने अकोला शहरासह बोरगाव मंजू, मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस स्टेशन व अमरावती जिल्ह्यात दुचाकी चोरी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अकोट शहरातील खानापूर वेस परिसरातून शरद सहारे यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या चोरट्याने बोरगाव मंजू येथून दुचाकी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट व दर्यापूर येथूनही दुचाकी चोरी केल्याची कबुली सहारे या आरोपीने पोलिसांसमोर दिली. त्यानंतर पोलिसांनी अटक करून अटक केली.
पुढील कारवाईसाठी या चोरट्यास बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या चोरट्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याचा आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेश जवरे, उमेश पराये, फिरोज खान, सुलतान पठाण, रवी खंडारे, महेंद्र मलिये, गोकुळ चव्हाण, वसीम उद्दीन, आकाश मानकर, अभिषेक पाठक, प्रशांत कमलकर, अकोट शहर पोलीस स्टेशनचे मनीष कुलट, विशाल हिवरे, रवी सदाशिव यांनी ही कारवाई केली.