अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे स्वच्छता सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याचा अहवाल ९ मे रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींतर्गत ४ हजार ६३१ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यापैकी १ हजार ४ स्रोत तीव्र व मध्यम जोखमीचे आढळून आले. त्यामुळे जोखमीच्या पाणीस्रोतांवर ग्रामस्थांची तहान भागविणार कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत कार्यरत आरोग्यसेवकांमार्फत गेल्या १ ते ३० एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींतर्गत गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या ४ हजार ६३१ पाणी स्रोतांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, या सर्वेक्षणाचे तालुकानिहाय अहवाल सातही तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार पिण्याच्या पाण्याचे २० स्रोत तीव्र जोखमीचे आणि ९८४ स्रोत मध्यम जोखमीचे असल्याचे आढळून आले. तीव्र व मध्यम जोखमीच्या स्रोतांच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर आरोग्यासाठी अयोग्य असल्याने, जोखमीच्या पाणीस्रोतांसंदर्भात उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
तीव्र व मध्यम जोखमीच्या पाणी स्रोतांची अशी आहे संख्या !तालुका तीव्र जोखमीचे मध्यम जोखमीचेअकोला ०० १३५अकोट ०७ १८०बाळापूर ०० १०१बार्शीटाकळी ०० ९२पातूर १३ २९४तेल्हारा ०० ५१मूर्तिजापूर ०० १३१
३,६२७ स्रोत सौम्य जोखमीचे
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ३ हजार ६२७ पिण्याच्या पाण्याचे स्रोत सौम्य जोखमीचे आढळून आले आहेत. त्यामुळे या स्रोतांचे पाणी पिण्यायोग्य असल्याचे वास्तव आहे.
‘या’ स्रोतांचे सर्वेक्षण
जिल्ह्यातील ग्रामीण भागात नळ पाणीपुरवठा योजना, बोअरवेल, हातपंप, बंदिस्त विहीर, उघडी विहीर आदी सार्वजनिक पाणीस्रोतांचे मान्सूनपूर्व सर्वेक्षण करण्यात आले.