अकोला : आकाशात चंद्र व सूर्य ग्रहणाचा अर्थात निसर्गातील सावल्यांचा खेळ आपण अनुभवतो असाच आकाश नजारा आयनिक वृत्त मार्गावरील असणाऱ्या ग्रह आणि ताऱ्यांसोबत घडत असतो. चंद्र आणि वृश्चिक राशीतील ठळक तारका ज्येष्ठा यांची पिधान युतीचा अनोखा नजारा सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी बघता येणार आहे.
चंद्र आणि ज्येष्ठा ताऱ्याच्या पिधान युतीला सोमवार, ५ फेब्रुवारीला पहाटे ४:४७ वाजता पूर्व आकाशात सुरुवात होणार आहे. सकाळी ६:०३ वाजेपर्यंत सुमारे सव्वा तास चंद्राचा वृश्चिक राशीतील लालसर रंगाच्या दिसणाऱ्या ज्येष्ठा ताऱ्यासोबतचा हा लपंडावाचा खेळ चालणार असल्याची माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.
स्पेस स्टेशनचे दर्शनअंतराळातील विविध प्रकारच्या घटनांसोबतच संशोधन करणारे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन नुसत्या डोळ्यांनी ठळक स्वरूपात सहज घेता येईल. स्पेस स्टेशन रविवार,४ फेब्रुवारी रोजी रात्री ७:४० ते ७:४५ वाजता दक्षिणेकडून वायव्य आकाशात सव्वा चार मिनिटे क्षितिजापासुन सुमारे ४५ अंश अंतरावरून गुरु ग्रहाजवळून जाईल. एवढेच नव्हे तर सोमवार, ५ फेब्रुवारी रोजीही सायंकाळी ६:५२ ते ६:५९ या वेळी सुमारे साडेसहा मिनिटे वायव्य ते आग्नेय आकाशात जवळपास ७३ अंश अंतरावरून ठळक स्वरूपात बघता येईल.