अकाेला: मकरसंक्रांतीला पंतग उडविण्याची हाैस निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठली आहे. नायलाॅन मांजामुळे गळा चिरल्याने एका ३४ वर्षीय युवकाचा तडफडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना १४ जानेवारी राेजी सायंकाळी ६ वाजता पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेर उड्डाणपूलावर घडली आहे. संपूर्ण दिवसभरात नायलाॅन मांजामुळे शहरात चार जण व ग्रामीण भागात तीन असे एकूण सात जण जखमी झाले आहेत. मकरसंक्रातीच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
किरण प्रकाश साेनवणे (३४ रा.अकाेटफैल अकाेला)असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. किरण साेनवणे हे खासगी इलेक्ट्रिशियन असून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते निमवाडी परिसरातून दुचाकी क्रमांक एमएच ३० एजी-१९७२ ने नेहरु पार्क चाैकाकडे निघाले हाेते. पाेलिस अधीक्षक कार्यालयासमाेरील उड्डाणपूलावर येताच त्यांच्या गळ्याला नायलाॅन मांजाचा फास बसून गळा चिरला गेला. या घटनेत किरण जागेवरच काेसळले व माेठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा तडफडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणन्यात आला हाेता. यावेळी खदान पाेलिस स्टेशनचे ठाणेदार मनाेज केदारे यांनी सर्वाेपचारमध्ये धाव घेतली. याप्रकरणी खदान पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. चेहऱ्याला दुखापत; डाेळे बचावले!
दुपारी दुकान बंद करुन घरी जाण्यासाठी निघालेले गणेश श्रीवास्तव यांना नायलाॅन मांजामुळे दुखापत झाल्याची घटना खाेलेश्वर परिसरात घडली. यामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर दुखापत झाली असून डाेळे थाेडक्यात बचावले. त्यांच्यावर सर्वाेपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. नायलाॅन मांजामुळे तीन जण जखमी
शहराच्या विविध भागात नायलाॅन मांजामुळे तीन जण जखमी झाल्याचे समाेर आले. यामध्ये दादाराव वानखेडे मलकापूर, श्लाेक इंगळे, सुमित गायकवाड रा.खडकी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. प्रशासकीय यंत्रणांची उदासिनता जीवावर
जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी नायलॉन मांजाच्या खरेदी-विक्रीला बंदी घाण्याचा आदेश जारी केला हाेता. हा आदेश शहरासह संपूर्ण जिल्हाभरात ६ डिसेंबर २०२४ च्या रात्रीपासून ३१ जानेवारी २०२५ च्या रात्री १२ पर्यंत लागू आहे. या कालावधीत पाेलिसांनी नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाइ केली हाेती. इतर प्रशासकीय यंत्रणांनी थातूर मातूर कारवाया करुन वेळ मारुन नेल्याचे दिसून आले.