तेल्हारा: तालुुक्यातील नागरिकांसाठी ‘वान’चे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी युवाशक्ती संघटनेतर्फे ४ डिसेंबररोजी टाॅवर चौक-शेगाव नाकापर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांसाठी आक्रोश करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
वानचे पाणी पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, खरीप हंगामाची आणेवारी काढून शेतकऱ्यांना मदत निधी व पीक विम्याचा लाभ द्यावा, कृषी पंपंना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा द्यावा, रस्त्यांची दुरुस्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी युवाशक्तीने आक्रोश मोर्चा, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी उपजिल्हाधिकारी सुरंजे यांनी मागण्या ऐकून घेत त्या त्वरित सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेचे भवानी प्रताप यांनी सात दिवसांची मुदत दिली. या दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, सकाळी ६ ते दुपारी १२ वाजतापर्यंत शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. (फोटो)
=====================
तालुक्यातील आणेवारीबाबत स्थानिक प्रशासनाला उपजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
तालुक्यातील नजरअंदाज आणेवारी ६२ पैसे काढण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी दुष्काळ मदत निधी तसेच पीक विम्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे ६२ पैसे आणेवारी कशी काढली, याबाबत युवाशक्ती संघटना आक्रमक झाल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुरंजे स्थानिक प्रशासनाला योग्य आणेवारी काढण्याचे निर्देश दिले आहेत.
====================