शिर्ला (जि. अकोला): सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या पातूर तालुक्यात अभिनेता आमिर खान व त्यांची पत्नी किरण राव उद्या ९ मे रोजी येणार असून, चारमोळी आणि शिर्ला येथील कामांची पाहणी करणार आहे. चारमोळी येथे आमिर खान सकाळी ११ वाजता पोहचणार आहेत. तेथे विविध कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत. पाणी फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी सत्यजीत भटकर यांनी ८ मे रोजी भेट देऊन पाहणी केली. गावात जलचळवळ उभारणारे सचिन कोकाटे आणि संतोषकुमार गवई व आपल्या साक्षगंधाचे सर्व पैसे दुष्काळमुक्तीसाठी देणार्या अनिसा पठाण यांच्याबरोबर आमिर खान दीड तास चर्चा करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता सरपंच रिना सिरसाट यांच्या अध्यक्षतेत आमिर खान आणि किरण राव गावकर्यांशी थेट संवाद साधणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार रामेश्वर पुरी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे व तलाठी नंदकिशोर जाने उपस्थित राहणार आहेत. सोळा वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून १२ एकरावर रेशीम प्रकल्प उभारण्यात आला होता; मात्र भूगर्भातील पाणीसाठा संपल्याने हा प्रकल्प संपल्यातच जमा होता; मात्र आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणामुळे जलसैनिकांनी जलसंधारणाचे विविध उपचार करून सदर प्रकल्प पुनर्जीवित केला आहे. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. हे वृत्त ऑनलाइन पाहून आमिर खानने शिर्ला गावात भेट देण्याचा निर्णय घेतला.
आमिर खान आज अकोला जिल्ह्यात
By admin | Published: May 09, 2017 1:54 AM