- संतोष येलकर
अकोला: शासनाच्या ग्राम विकास विभागांतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात गत पाच वर्षांच्या कालावधीत पंचायत समित्या स्तरावरील विस्तार अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्याने विभागात पंचायत समित्यांच्या सहायक गटविकास अधिकाऱ्यांची (एबीडीओ) ३४ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्राम विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळणार तरी कशी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत २०१५ पासून जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील विस्तार अधिकारी (पंचायत), विस्तार अधिकारी (शिक्षण), आरोग्य पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), सहायक प्रशासन अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांना सहायक गटविकास अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याची प्रक्रिया रखडली आहे. पात्र विस्तार अधिकारी व संबंधित संवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये सहायक गटविकास अधिकाऱ्यांची ३४ पदे रिक्त आहेत. शासनामार्फत ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि विकासकामांची अंमलबजावणी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमार्फत करण्यात येते; मात्र अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात पंचायत समित्या स्तरावरील सहायक गटविकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ग्राम विकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीला गती कशी मिळणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यानुषंगाने विभागातील पात्र विस्तार अधिकारी व संबंधित संवर्गातील अधिकाऱ्यांना सहायक गटविकास अधिकारी पदावर पदोन्नती केव्हा मिळणार आणि विभागातील रिक्त असलेली सहायक गटविकास अधिकाऱ्यांची पदे भरण्याची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हानिहाय अशी आहेत
‘एबीडीओं’ची रिक्त पदे!
जिल्हा पदे
अमरावती ०९
यवतमाळ १०
अकोला ०४
वाशिम ०६
बुलडाणा ०५
.............................................
एकूण ३४