अकोला : राज्यात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक आर्थिक मदतीसाठी सारथी, बार्टीच्या धरतीवर महाज्योती स्थापना करण्यात आली; मात्र यासंदर्भात अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही, त्यामुळे महाज्योतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत ॲग्रीव्हिजन विदर्भ प्रांत व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात विविध शैक्षणिक क्षेत्रातील हजारो विद्यार्थी महाज्योती शिष्यवृत्तीसाठी तयारी करीत आहेत. त्यात कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. कृषीच्या विविध आचार्य पदवीसाठी प्रचंड आर्थिक शुल्क आहे, त्यामुळे राज्यातील शेतकरी पुत्रांची महाज्योतीच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली आहे.
संशोधनात्मक शिक्षणासाठी खर्च लागतोच, त्यामुळे महाज्योतीने घोषित केलेल्या विविध योजनांची विद्यार्थी आतुरतेने वाट बघून होते; मात्र त्या संबंधित जाहिरात काढलीच नाही. कोविडच्या परिस्थितीत आर्थिक स्थिती ढासळली असताना शासनाने विद्यार्थ्यांना स्वप्न दाखवून भंग करण्यासारखे असल्याचे निवेदनात म्हटले. यावेळी प्रांतसह मंत्री अभिषेक देवर, ॲग्रीव्हिजन सह संयोजक विदर्भप्रांत अनिकेत पजई व महानगर सहमंत्री आदित्य केंदळे उपस्थित होते.