अकाेला : काेराेनाच्या संकटामुळे सध्या संपूर्ण जग धास्तावले आहे. या संकटावर मात करण्यासाठी ज्या उपाययाेजना केल्या जात आहेत त्या उपाययाेजनांचे मूळ हे भगवान महावीरांच्या सिद्धांतात आहे, असे विवेचन औरंगाबाद येथील उद्याेजक सुनील देसरडा यांनी केले. भगवान महावीर जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिकच्या महावीर इंटनॅशनलकडून आयाेजित ऑनलाईन महावीर व्याख्यानमालेत ते बाेलत हाेते. परमपूज्य वाणीभूषण प्रीतिसुधाजी म. सा. क्रांतिकारी मधुस्मिता जी म. सा. यांच्या उपस्थितीत आयाेजित या व्याख्यानमालेचे उद्घाटन महावीर इंटरनॅशनलच्या झाेन चेअरमन सुमन जैन यांच्या हस्ते झाले. यावेळी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष ओसवाल, एमआरसी जैन सोशल ग्रुप नाशिकचे सचिन शाह उपस्थित हाेते. देसरडा यांनी अहिंसा, सत्य, संयम, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या महावीरांच्या सिद्धांतांची काेराेना काळातील उपयुक्तता विशद केली. संक्रमित असाल तर सत्य बाेला, नियमांचे पालन करा कुणालाही कायिक, वाचिक हिंसा करू नका, ज्या गाेष्टी टाळायला सांगितल्या आहेत त्या संयमाने टाळा, जेवढे आवश्यक आहे तेवढेच घ्या हेच अपरिग्रह आहे, दान करा. ‘जिओ और जिने दाे’ या विचारांचे पालन दानातून हाेते. माैन बाळगा त्यामुळे मुखाद्वारे संक्रमण टाळता येईल असे सूत्र देसरडा यांनी सांगितले. जैन धर्मात अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनच मुखपट्टीचा वापर केला जाताे. आज काेराेनाच्या विराेधात मास्क हे सर्वात उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट झाले. शाकाहाराचा सर्वत्र हाेत असलेला स्वीकार, ध्यान करण्यासाठी जैन मुनी एकांतवास ग्रहण करत असत त्यालाच
अलगाव आणि साैम्य अलगाव असे म्हणतात. काेराेनाच्या काळात सध्या रुग्णांसाठी अलगीकरण आणि विलगीकरणाच्या ज्या संकल्पना आहेत त्याचा उगम याच सिद्धांतात असल्याचे मत देसरडा यांनी व्यक्त केले. जैन धर्म हा जीवन जगण्याचा धर्म आहे. जन, जंगल व पर्यावरण यांच्याबाबत संवेदनशील न राहिल्यानेच काेराेनासारखे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जैन विचारांचे कृतियुक्त पालन करून आपण काेराेनाला दूर करू शकताे, असा विश्वास त्यांनी केला. साध्वी प्रीतिसुधाजी यांनी महावीरांच्या आयुष्यातील प्रसंग सांगत त्यांच्या विचारांची सर्वव्यापी उपयुक्तता विशद केली. प्रारंभी सुमन जैन यांनी महावीरांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी असल्याचे मत व्यक्त केले. सुभाष ओसवाल यांनी आजच्या तणावाच्या वातावरणात महावीरांच्या विचारांचा कृतियुक्त वारसा अतिशय उपकारक ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. सचिन शहा यांनी काेराेना काळात सुरू असलेल्या समाजकार्याची माहिती दिली. संचालन डॉ. संगीता बाफना यांनी केले. यावेळी महावीर इंटनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, सचिव राजेंद्र बाफना आदी उपस्थित हाेते.