अकोला: खैर मोहम्मद प्लॉटमध्ये बैलांची कत्तल करणार्या चार आरोपींपैकी एका फरार आरोपीस पोलिसांनी मंगळवारी अटक केली. यामधील अटकेत असलेल्या तीनही आरोपींना जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता; मात्र सदर अर्ज न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला. खैर मोहम्मद प्लॉटमध्ये एका ठिकाणी रविवारी दुपारी बैलांची कत्तल सुरू असताना डाबकी रोड पोलिसांनी छापा मारून चार आरोपींना रंगेहात अटक केली होती. यामधील एक आरोपी नगरसेवकाचा भाऊ असल्याचे समोर आले असून, पोलिसांना या ठिकाणी एक बैल कापलेल्या स्थितीत आढळला, तर चार बैल कापण्याची तयारी आरोपींनी चालविली होती. डाबकी रोड पोलिसांनी वेळीच छापा मारल्यामुळे या चार बैलांना जीवनदान मिळाले. खैर मोहम्मद प्लॉटमध्ये शेख अनिस शेख मुमताज, शेख मुमताज शेख रसूद, नजीर अहमद अब्दुल बशीर व शेख निसार शेख गफ्फार या चार जणांनी पाच बैलांची कत्तल सुरू केल्याची माहिती डाबकी पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी घटनास्थळावर छापा मारून चार बैलांना जीवनदान दिले. तथापि, एका बैलाला पूर्णपणे कापल्यामुळे पोलीस त्या बैलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. डाबकी रोड पोलिसांनी यामधील तीन आरोपींना अटक केली, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता. या फरार आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, आधीच अटकेत असलेल्या तीन आरोपींनी जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने या तीनही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. गोवंशाची कत्तल करणार्या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्याने गोवंशाची कत्तल करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
फरार आरोपीस अटक, तिघांचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: October 14, 2015 1:22 AM