राजरत्न सिरसाट/अकोला : शेतकर्यांना आता दज्रेदार उती संवर्धित संत्रा, केळींची रोपे मिळणार आहेत. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी जैवतंत्रज्ञान गुणवत्ता केंद्रांतर्गत उती संवर्धित प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेवर सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशात मागणीनुसार उर्ती संवर्धित रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. विदर्भात संत्रा व खान्देशात केळी फळपीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. पण, या पिकाच्या रोपात मोठय़ाप्रमाणात भेसळीचे प्रमाण आढळत असल्याने शेतकर्यांना अनेकवेळा मोठा तोटा सहन करावा लागतो. या प्रकल्पांतर्गत आता भेसळयुक्त रोपांचा शोध घेतला जाणार असून, संत्र्यांची रोपवाटिका विकसित करण्यात येत आहे. या रोपवाटिकेतून विषाणूमुक्त व रोगमुक्त संत्रा रोपे तयार करण्यात येतील. यासाठी उती संवर्धन व संत्र्यासाठी लागणारे विविध संशोधन रोपवाटिका व प्रयोगशाळेत करण्यात येईल. विदर्भात जवळपास १ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्र आहे. परंतु, या संत्र्याचे उत्पादन हेक्टरी ३ ते १0 टन एवढेच र्मयादित आहे. १0 टनाचे उत्पादन फार कमी शेतकरी घेतात. देश-विदेशात मागणी असलेल्या नागपुरी संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकर्यांना दिलासादायक ठरणार असल्याने यावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. हिमाचल प्रदेशातून गलगल जातीच्या संत्र्यांची रोपे येथे आल्याने येथील संत्रा फळझाडांचे नुकसान झाले आहे. उत्पादकता घटली आहे. या गलगल रोपांचा शोध शासकीय व इतर ठिकाणच्या रोपवाटिकेत घेतला जात आहे. येथे रोगमुक्त रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा बांधण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या बांधकामासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सहा कोटी रुपये मिळाले असून, आता लवकरच येथे संशोधन सुरू होईल. या प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले.
अकोल्यात मिळणार दज्रेदार उती संवर्धित केळी, संत्रा रोपे!
By admin | Published: February 08, 2016 2:38 AM