- सचिन राऊत
अकाेला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याची दहा प्रकरणे जिल्ह्यात घडली असून, यामध्ये दाेन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. गत आठ महिन्यांत इतर शासकीय विभागाचे आठ अधिकारी व कर्मचारी अशा एकूण दहा जणांवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
नियमात बसणारेही काम करून देण्यासाठी लाच मागितली जाते. काही जण काम लवकर व्हावे म्हणून लाच देतात तर काही जण याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करतात. गत आठ महिन्यांत एकूण दहा जणांवर कारवाई करण्यात आली असून, यामधील दाेन पाेलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने ट्रॅप केल्याची माहिती आहे़ यामधील एक पाेलीस कर्मचारी रामदास पेठ पाेलीस ठाण्यातील असून दुसरा बार्शीटाकळी पाेलीस ठाण्यात कार्यरत हाेता़
पोलिसांनी घेतली लाच
रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यानुसार सापळा रचून लाचेची मागणी करणाऱ्या संंबंधित पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले होते. तर बार्शीटाकळी पाेलीस ठाण्यातील एका पाेलीस कर्मचाऱ्यास लाचेची रक्कम घेताना अटक करण्यात आली हाेती़
अन्य विभागांचे सहा जण जाळ्यात!
जिल्ह्यात गत आठ महिन्यांत अन्य विभागांच्या सहा जणांवरही कारवाई केली. यामध्ये तहसील कार्यालयातील काेतवाल, पंचायत समितीच्या प्रधानमंत्री आवास याेजनेचे कंत्राटी अभियंता यांच्यासह पंचायत समिती व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह तहसीलदार व पुरवठा निरीक्षकावरही कारवाई करण्यात आली आहे़
गतवेळी झाली होती १० जणांवर कारवाई
जानेवारी ते ऑगस्ट २०२० या कालावधीत एकूण दहा जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला होता. २०२० च्या तुलनेत यंदाच्या आठ महिन्यांतही तेवढ्याच कारवाया झाल्याचे वास्तव आहे.
लाच मागत असेल, तर येथे संपर्क साधा...
कोणतेही शासकीय, निमशासकीय कामासाठी कुणीही लाच मागू नये तसेच लाच देऊ नये, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे केले जाते. कुणी लाच मागत असेल तर १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तसेच अकाेला येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधता येते.
या वर्षभरात झालेली कारवाई अशी...
जानेवारी ०१
फेब्रुवारी ०१
मार्च ००
एप्रिल ००
मे ००
जून ०४
जुलै ०२
ऑगस्ट ०२