- नितीन गव्हाळे
अकोला: समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांना जलदगतीने शिक्षण देऊन इयत्ता दहावीची तयारी करून घेण्याच्या दृष्टिकोनातून एएलपी कार्यक्रम २0१८-१९ (अॅक्सलरेटेड लर्निंग प्रोग्राम) सुरू करण्यात आला. शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून १५ शाळांचा एक गट तयार करून त्यापैकी एका शाळेची संपर्क शाळा म्हणून निवडसुद्धा करण्यात आली आहे.जिल्हा शैक्षणिक व व्यावसायिक विकास संस्थेच्या पुढाकारातून नववीतील विद्यार्थ्यांसाठी एएलपी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. प्राथमिक शाळेतून विद्यार्थी माध्यमिक शाळेत इयत्ता नववीत येतो. तेव्हा परीक्षा पद्धती, काठिण्य पातळीत बदल होता. आठवीतून नववीत गेल्यावर विद्यार्थी कच्चे असतात. त्यांना शिकविताना अनेकदा समजत नाही. यातून मुलांची अनुपस्थिती वाढते आणि अनुपस्थितीमुळे शिक्षण घेताना अडचणी येतात. नववीत अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. यावर उपाययोजना म्हणून एएलपी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नववीत पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले, आठवीतून नववीत जाताना क व ड श्रेणी प्राप्त विद्यार्थी एएलपी लाभार्थी असतील. १५ शाळांचा संपर्क गट तयार करून आॅगस्ट महिन्यापासून या गटांचे महिन्यातून एका संपर्क सत्र घेण्यात येईल. त्यापैकी संपर्क शाळेमध्ये दर महिन्यातून एका शनिवारी शाळेत एएलपी संदर्भात करत असलेले प्रयोग, तयार केलेली शैक्षणिक साधने, शैक्षणिक व्हिडिओंचे आदान-प्रदान १५ शाळांमध्ये होईल.एएलपीचा उद्देशसाडेचार वर्षातील शिक्षणाची तूट भरून काढून नववी शिकण्याच्या पातळीपर्यंत मुलांना आणणे, प्रामाणिकपणे नववी उत्तीर्ण होणे, मूल स्वत: शिकणे, गुणवत्ता विकास करणे, आत्मविश्वास निर्माण करणे, आनंददायी शिक्षण देऊन विद्यार्थी उपस्थिती वाढविणे आदी जलद गती शिक्षणाचे उद्देश आहेत. त्यासाठी १५ दिवस कच्च्या संबोधांचे कृतिशील-रचनावादी अध्यापन, ३0 दिवस विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन, १५ दिवस समजलेल्या संबोधांचे दृढीकरण व राहिलेले संबोधन पूर्ण करणे असे एएलपीच्या उपक्रमाच्या वेळेची विभागणी करण्यात आली आहे.
नववीमध्ये क व ड श्रेणीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित व इंग्रजी विषयाची तयारी कृतिशील व रचनावादी अध्यापनातून तयारी करून घेत, त्यांना दहावी परीक्षेसाठी तयार करण्यासाठी एएलपी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.- जितेंद्र काठोळे, समन्वयकएएलपी कार्यक्रम