हातरुण: गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी अनेक ठिकाणी 'लिकेज' झाली होती. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत होता. तसेच दूषित पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाने जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली असून, काम प्रगती पथावर सुरू असल्याने पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
हातरुण येथे जलवाहिनीला अनेक ठिकाणी लिकेज निर्माण झाल्याने पाण्याची गळती होत होती. यामुळे लिकेज झालेल्या ठिकाणी दूषित पाण्याचे डबके निर्माण झाले होते. पाणी वाया जात असल्याचे नवनिर्वाचित सरपंच वाजिद खान यांना समजताच त्यांनी ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन चर्चा केली. हातरुणचे सरपंच वाजिद खान, ग्रामसेवक किशोर वाकोडे, उपसरपंच संध्याताई डोंगरे यांनी गावात फिरून पाईपलाईन वरील लिकेजची पाहणी केली. त्यानंतर लिकेज दुरुस्तीचे काम सुरू झाले. अनेक लिकेजची दुरुस्ती करण्यात आली. पाण्याच्या टाकी जवळील लिकेजची दुरुस्ती करण्यात येणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहावा यासाठी ग्रामपंचायत कडून उपाययोजना करण्यात येत आहेत.
हातरुण गावची लोकसंख्या मोठी असून उन्हाळ्यात पाणी टंचाई ची समस्या निर्माण होऊ शकते. गावात बोअरवेल साठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
- वाजिद खान, सरपंच, हातरुण.