अकोला : गाडगेबाबा, पंजाबराव देशमुख, डॅडी देशमुख यांनी सुरू केलेली विदर्भातील सत्यशोधक समिती कुठे लुप्त झाली, चिंतन आणि सामाजिक सृजनतेचा अभाव अलीकडे जाणवतो, त्यामुळे समाजाची प्रगती कुठेतरी थांबली आहे. डॅडी देशमुख यांच्या परिवर्तनाच्या विचारांचा वारसा कार्यकर्त्यांनी स्वीकारून समाजकार्यात हातभार लावावा, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक बाबा अढाव यांनी केले. स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात आयोजित प्राचार्य डॅडी देशमुख कार्यकर्ता पुरस्कार सोहळ्यात ते शनिवारी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने प्राचार्य डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भस्तरीय कार्यकर्ता पुरस्काराने अकोल्यातील सर्पमित्र बाळ काळणे यांना सन्मानित करण्यात आले.समितीतर्फे आणि डॅडी देशमुख परिवारातर्फे मिळून २१ हजार रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन काळणे यांना गौरविण्यात आले. काळणे यांची आई, पत्नी पुरस्कार स्वीकारताना प्रामुख्याने उपस्थित होत्या.अनेक शिक्षक शाळा, महाविद्यालयांमध्ये आहेत; पण काय शिकवावे, हे कुणाला समजत नाही. खोटा दांभिकपणा आपल्यात येत आहे. जाती अंताच्या विषयावर कुणी बोलत नाही, त्यामुळे पाच हजार जातींभोवतीच सर्व पक्षांचे राजकारण सुरू आहे. इतर समस्या दिसत नाहीत. कोणत्या दिशेने माणूस प्रवास करीत आहे, समजत नाही. अजूनही जाती-पातीचीच माणसे शोधली जातात. विचार विकासाचे निकष लागत नाही. वैज्ञानिक विचार स्वीकारत जाती अंताबाहेर काढण्याची जबाबदारी परिवर्तनवादींनी खांद्यावर घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिसचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रमुख अतिथी म्हणून प्रा. विठ्ठल वाघ, महादेवराव भुईभार, प्रा. तुकाराम बिडकर, प्रशांत देशमुख, डॉ.आर.एम. भिसे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तिडके यांनी केले. डॅडींचा कौटुंबिक परिचय राजश्री देशमुख यांनी करून दिला. सन्मानपत्राचे वाचन बबनराव कानकिरड यांनी केले. दरम्यान, प्रा. विठ्ठल वाघ आणि सत्कारमूर्ती बाळ काळणे यांनी मनोगत व्यक्त केले. डॅडींच्या नावे मिळालेल्या पुरस्काराने सामाजिक कार्याची जबाबदारी वाढल्याचे मत काळणे यांनी येथे व्यक्त केले. कार्यक्रमाला शहरातील पुरोगामी विचारसरणीची प्रतिष्ठित मंडळी उपस्थित होती.------------------------------------------फोटो : सत्कार २२ च्या तारखेत