वाशिम : एका गुन्हेगारी प्रकरणातून आरोपीची सुटका करण्यासाठी दोन हजाराची लाच स्वीकारताना मंगरूळपीर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरिक्षकास वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. एका महिलेच्या घरामध्ये घुसून एका आरोपीने कायद्याचे उल्लंघन केले होते. या आरोपीला परिसरातील नागरिकांनी पकडून मंगरूळपीर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. या आरोपीवर थातुर- मातूर कारवाई करून, त्याला सोडावे, यासाठी पोलीस उपनिरिक्षक वैभव दामोदर पराते याने १२ एप्रिल २0१६ रोजी आरोपीच्या तक्रारदार मित्राला पाच हजार रूपयांची मागणी सरकारी पंचासमक्ष केली. त्यापैकी तीन हजार रूपये त्याने स्विकारले होते. उर्वरीत रक्कम २५ एप्रिल रोजी देण्याचे ठरले होते. दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठरल्यानुसार २५ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास मंगरूळपीर पोलीस स्टेशन परिसरात सापळा रचला. यावेळी आरोपी पोलीस उपनिरिक्षकाने पंचासमक्ष उर्वरीत दोन हजाराची लाच स्विकारताच, एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधिक्षक महेश चिमटे, अपर पोलीस अधिक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक आर. व्ही. गांगुर्डे यांच्या पथकाने केली.
दोन हजाराची लाच स्वीकारताना पोलीस अधिका-यास अटक
By admin | Published: April 26, 2016 2:00 AM