अकोटः लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाला मालवाहतूक गाडीने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वाहनचालकासह चार जण जखमी झाले. हा अपघात ८ जानेवारी राेजी अकाेला राेडवर घडला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून, जखमींवर उपचार सुरू आहेत.
अकोट तालुक्यातील बोर्डी येथे लग्नाकरिता एमएच ३० ए झेड ०९२५ या वाहनाने प्रवासी घेऊन मो. जुबेर मो. इरफान हा वाहनचालक जात होता. दरम्यान, अकोला रोडवर एका हाॅटेलजवळ समोरून येणाऱ्या एमएच ३० एबी०११८ क्रमांकाचे टाटा ४०७ या गाडीने समोरून धडक मारल्यामुळे अपघात झाला. या अपघातात गाडीमधील राज नुरवी हुसेन शहा, शकीला बी हजिज शहा, हमीदाबी महेबुब शहा व वाहनचालक मो. जुबेर मो इरफान जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. तर धडक मारणारे वाहन या अपघातात पलटी झाले. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये मो. असलम मो. इरफान यांच्या फिर्यादीवरून भरधाव वेगाने व निष्काळजी वाहन चालविणाऱ्या मालवाहतूक चालकाविरुद्ध भादंविच्या कलम २७९,३३७,४२७ नुसार गुन्हा दाखल केला.