लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर/वाडेगाव : वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे येथील १७0 वारक री श्रींच्या प्रकट दिनानिमित्त शेगावला जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी पायदळ निघाले होते. आपले चार सहकार्यांचे निधन झाल्याने या वारकर्यांनी श्रींचे दशर्न न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला.उमरा कापसे येथील उत्तम पंडितराव कापसे यांच्या नेतृत्वात १ फेब्रुवारीला पायदळ दिंडी शेगाव येथे जाण्यासाठी निघाली होती. ही पायदळ दिंडी विविध ठिकाणी मुक्काम करून ५ फेब्रुवारी रोजी पातूर-बाळापूर रस्त्यावरील बाघ फाट्यावर पोहोचली होती. तेथे विसावा घेत असतानाच ही घटना घडली. या अपघातामुळे दिंडीतील वारकरी भेदरले होते. या वारकर्यांना वाडेगाव येथील ग्रामस्थांनी धीर दिला. चार वारकर्यांच्या मृत्यूने हादरलेल्या इतर वारकर्यांनी संत नगरी शेगावचा पुढील प्रवास थांबवला. तसेच श्रींचे दर्शन न घेता परत आपल्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. या वारकर्यांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी संतोष लोखंडे,महेंद्र अप्पा,बी.के.काळे व बाबुराव अजगर यांनी मदत केली. आपल्या सहकार्यांच्या मृत्यूने दु:खी झालेल्या वारकर्यांनी साश्रू नयनांनी परतीचा मार्ग धरला.
वाडेगावच्या ग्रामस्थांनी दिला मदतीचा हात वारकर्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच वाडेगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेऊन सरकीखाली दबलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढले, तसेच या मार्गाने जाणार्या इतरांनीही जखमींना मदतीचा हात दिला. तसेच अपघातामुळे भेदरलेल्या वारकर्यांना दिलासा दिला.
तीन दिवसांत १0 जण ठार गेल्या दोन दिवसांत पातूर आणि बाळापूर तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. तीन दिवसात सहा अपघातात १0 जण ठार झाले आहेत. शनिवारी पातूर तालुक्यात तीन वेगवेगळ्य़ा अपघातात चार, तर बाळापूर तालुक्यात एक विद्यार्थी ठार झाला होता. रविवारी विवरा फाट्यावर दुचाकी अपघातात एक जण ठार झाला होता, तर सोमवारी झालेल्या भीषण अपघातात चार वारकरी ठार झाले आहेत. जिल्ह्यात रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे अपघातात मोठी वाढ झाली आहे.
ट्रकचालक फरार अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, बाळापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख, ठाणेदार विनोद ठाकरे तसेच वाहतूक पोलीस, पोलीस स्टेशन तुकडी वाडेगावचे पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी आदी घटनास्थळावर पोहोचले, तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.