राजेश शेगाेकार, अकाेला
एकीकडे व्याघ्र संवर्धनासाठी अनेक प्रयत्न केले जात असून, वाघांच्या संवर्धनासाठी सन १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प ही योजना अंमलात आली. सद्य:स्थितीत देशात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत, मात्र तेच बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. त्यासाठी कुठलीच विशेष यंत्रणादेखील नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत बिबट्यांचे अपघाती मृत्यू वाढले आहेत. अकाेल्यातील पातूरमध्ये गुरुवारी दाेन बिबट विजेच्या धक्याने मृत्यू पावले या घटनेच्या निमित्ताने बिबट्यांचा अपघाती मृत्यूचा आढावा घेतला असता गेल्या दहा वर्षांत तब्बल ८६० बिबट्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यामध्ये गेल्या १२ महिन्यांत तब्बल १७५ बिबट्यांचा समावेश आहे महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळाच्या ४ डिसेंबर राेजी झालेल्या बैठकीत बिबट्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार सन २०१८ मध्ये भारतात एकूण ४६० बिबटे मृत पावले आहेत. यात एकूण ९० शिकारीची प्रकरणे उघडकीस आली होती, तर २२ बिबट्यांना चक्क गावकऱ्यांनी यमसदनी पाठविल्याच्या घटना घडल्या आहेत. उर्वरित मृत्यूबाबत मात्र अजूनही कुणालाही थांगपत्ता लागलेला नाही. सन २०१९ मध्ये महाराष्ट्रातील तब्बल ११० बिबट्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. सन २०२० मध्ये १७५ बिबटे मृत झाले असून, त्यात विजेच्या धक्क्याने तब्बल ९ मृत्यू आहेत.
धक्कादायक म्हणजे यामध्ये बिबटे व इतर प्राण्यांच्या संवर्धनासाठी एकही रुपया खर्च केल्या गेला नसल्याचे एका अहवालातून निष्पन्न झाले आहे. वाढती शिकार, संवर्धनात असलेले दुय्यम स्थान पाहता बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यूच्या आकडेवारीची तुलना केल्यास वाघांच्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण दोनशे पटींहून अधिक आहे.
काेट
बिबट्यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या १६व्या बैठकीत यावर चर्चा झाली. भारतातील बिबट्यांचे रस्ते अपघात, शिकार व विजेच्या धक्का लागून मृत्यू होणे हे थांबविणे एक मोठे आवाहन आहे. विजेच्या धक्क्याने होणारे मृत्यू चिंतेचा विषय असून, लोकांना विश्वासात घेऊन जनजागृती करणे आवश्यक आहे.
- यादव तरटे पाटील
सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळ