खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी येथे व्हायरल फिव्हरची साथ पसरली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील रुग्णसंख्या ५० वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाची सेवा कोलमडली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण खासगी डॉक्टरकडे धाव घेत असून, रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून सायवणी येथे तापाची साथ सुरू आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्दी, ताप, खोकला आदींचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. संबंधित आरोग्य विभागाने वेळीच दखल न घेतल्यास व्हायरल फिव्हरची साथ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये लहान मुले, वृद्ध, तरुणांचा समावेश आहे. आजारी असलेल्या रुग्णावर ठोस उपचार होत नसल्याने रुग्णांना खासगी डॉक्टरकडे धाव घ्यावी लागत आहे. संबंधितांनी दखल घेऊन आजारी असलेल्या रुग्णांवर उपचार करावा, अन्यथा व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. औषधींचा तुटवडा असल्याने गावात आरोग्य पथक किंवा रुग्णावर उपचार केला जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
-----------------------सायवणी येथे गेल्या महिनाभरापासून व्हायरल फिव्हरची साथ सुरू असून, माझ्या घरी पाच रुग्ण आजारी आहेत. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे गावात रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य पथकाने सर्वेक्षण करून तपासणी करावी.
- विजयकुमार ताले, सायवणी.