पातूर तालुक्यातील आलेगाव, कार्ला, जांभ, पाचरण, पिंपळडोळी, पेडका, नवेगाव, उंबरवाडी, अंधारसांगावी, चोंढी, धरण घोटमाल, सोनुना, झरंडी, वसाली, पांगरताटी, पहाटसिंगी आदी गावांमध्ये व्हायरल फिव्हरची साथ पसरली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालये हाउसफुल झाल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे नागरिक शासकीय रुग्णालयांकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. रुग्णांना ताप, डोके दुखणे, सर्दी आदी लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णांमध्ये जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. रुग्ण अंगावर आजार काढत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
------------------
कोरोनाची लक्षणे असल्यास नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. घरी उपचार करू नये. कोरोनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
-डॉ. विजय जाधव, तालुका आरोग्य अधिकारी, पातूर
--------------------------------------
अंबाशी येथे काविड-१९ लसीकरण
अंबाशी : प्राथमिक आरोग्य केंद्र आलेगाव अंतर्गत येथील उपकेंद्रात कोरोना लसीकरण दि. २५ मार्चपासून सुरू झाले आहे. पूर्वी ६० वर्षांवरील लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले; मात्र दि. १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील वयोगटातील महिला व पुरुषांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या उपकेंद्रांतर्गत आतापर्यंत अंबाशी, आसोला, बेलताळा, पळसखेड येथील नागरिकांनी लसीचा लाभ घेतला. आजपर्यंत जवळपास २८० लाभार्थींना लस देण्यात आली.
काही नागरिकांमध्ये लस घेतल्याने साधारण ताप, डोकेदुखी, अंगदुखी आदी लक्षणे जाणवली. कोविड-१९ लस सुरक्षित असून, ४५ वर्षांवरील सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लसीकरण सत्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. बबीता पाटील, एएनएम माधुरी सुलताने, आशा स्वयंसेविका सुनीता लाहोळे, वंदना राऊत यांची उपस्थिती होती. तसेच लसीकरण सत्रामध्ये लाभार्थींचे रजिस्ट्रेशन करून लसीकरण करण्यात आले. येथे लस घेतल्यानंतर ३० मिनिटे निरीक्षण कक्षामध्ये ठेवले जाते. तसेच न घाबरता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (फोटो)