निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, "आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 07:11 PM2024-06-05T19:11:05+5:302024-06-05T19:12:25+5:30
वंचित म्हणते, "अभय पाटील यांनी इतिहासात डोकून पहावे"
मनोज भिवगडे -
अकोला : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता आरोप-पत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी माध्यमांसोबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठी व भाजपला मदत करण्यासाठी असल्याचा आरोप केला आहे. त्यावर वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी डॉ. अभय पाटील यांना प्रत्युत्तर देताना काँग्रेसने गेल्या दोन निवडणुकीत काय केले होते, याची आठवण करून देत इतिसाहात डोकावून बघण्याचा सल्ला दिला आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी यांच्यात झालेल्या मतविभाजनामुळे भाजपचा विजय झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. काँग्रेसला ४० हजार मतांनी निसटता पराभव पत्करावा लागला. याबाबत माध्यमांशी बोलताना डॉ. पाटील यांनी आंबेडकर यांची भूमिका भाजपला पूरक असल्याचा आरोप केला. त्यावर वंचितचे पातोडे यांनी निवडणूक काळात केलेली टीका ही राजकीय स्वरुपाची होती. जनतेसमोर वस्तूस्थिती मांडण्याच्या दृष्टीने केलेली ती टीका होती. त्यामुळे पाटील यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. यापूर्वीच्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाळासाहेबांचा पराभव व्हावा या उद्देशानेच उमेदवार दिला होता, हे पाटील यांनी विसरू नये. त्यामुळे पुढे टीका करताना अभ्यास करूनच बोलावे, असा सल्लाही वंचित बहुजन आघाडीने पाटील यांना दिला आहे.